खामगाव (हॅलो बुलढाणा) रविकांत तुपकर यांच्या दुष्काळ संघर्ष यात्रेला सानंदा यांनी तुपकरांच्या हातात रुम्हणे देऊन पाठिंबा दर्शविल्याने शेतकरी प्रश्नांवरील राजकीय भूमिकांची चर्चा रंगली आहे. सत्तेत असूनही सानंदांनी समर्थन दिल्याचे सांगत तुपकर समर्थकांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले; मात्र विरोधी पक्षातील काही नेत्यांच्या कथित अडवणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काही विरोधी नेते गावागावांत फोन करून ‘तुपकरांच्या सभेला जाऊ नका, गर्दी करू नका,’ असे सांगत असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे
‘ही यात्रा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आहे. आमच्या हितासाठी होणाऱ्या सभांना आम्ही जाणारच. निवडणुकीचे निवडणुकीच्या वेळी पाहू; आज आमच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्याच्या पाठीशी उभे राहू,’ अशी भावना यात्रेला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
‘स्वतः लढता येत नसेल तर लढणाऱ्याला विरोध तरी करू नका. पाठिंबा देणाऱ्यांचे स्वागत आहे; अडथळे आणणाऱ्यांची भूमिका निवडणुकीत लक्षात ठेवू,’ असा इशाराही देण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा सभेतील गर्दीचा राजकीय हिशेब महत्त्वाचा आहे का, असा सवाल समर्थक उपस्थित करत आहेत. सानंदांच्या समर्थनानंतर इतर नेते यात्रेबाबत कोणती भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. यात्रेला मिळणारा पाठिंबा आणि विरोधाच्या आरोपांमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून शेतकरी प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी समर्थकांकडून होत आहे.













Total Users : 3796086