मासरूळ (हॅलो बुलढाणा) गावाच्या पाणीपुरवठ्याची नवीन पाइपलाइन जोडण्यासाठी धरणात उतरलेल्या सरपंचपुत्र मधुकर गणपत महाले यांचा बुडून मृत्यू झाला आहे. काल, १९ नोव्हेंबर रोजी दुपारी मासरूळ येथील धरणात बेपत्ता झालेल्या महाले यांचा मृतदेह शोधमोहिमेदरम्यान आढळून आला. त्यांच्या शोधाची अखेर दुःखद बातमीने झाली.
प्राप्त माहितीनुसार, मासरूळ गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातील नवीन लाइन जोडण्याचे काम सुरू होते. या कामासाठी मधुकर महाले यांच्यासह तिघेजण धरणात गेले होते. मात्र, याचदरम्यान महाले पाण्यात बुडाले आणि बेपत्ता झाले. ते नेमके कशामुळे बुडाले, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. शोध व बचाव पथकाने काल दुपारपासून धरणात शोधमोहीम सुरू केली होती. संबंधित अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून शोधकार्यावर लक्ष ठेवून होते. अखेर महाले यांचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली.गावाला पाणी मिळावे म्हणून कामासाठी धरणात गेलेल्या महाले यांनाच प्राण गमवावे लागल्याने ही घटना मनाला चटका लावणारी ठरली आहे













Total Users : 3796170