देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) ६ नोव्हेंबर २०२६
दिवाळीच्या निमित्ताने देऊळगाव राजाच्या तहसील कार्यालयात आज एक वेगळीच भेट पोहोचली. रेशन दुकानातून लाभार्थ्यांना मिळालेला तांदूळ घेऊन युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि सचिन कदम तहसील कार्यालयात पोहोचले. तालुका पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन देत त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना तोच तांदूळ ‘दिवाळी भेट’ म्हणून दिला. गोरगरीबांच्या ताटात देता, तो तांदूळ आधी स्वतः खाऊन पाहा, असे आव्हान त्यांनी प्रशासनाला दिले.
देऊळगाव राजा आणि चिखलीसह बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाटला जात असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. यापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर काही काळ चांगले धान्य मिळाले, पण दोन-तीन महिन्यांत पुन्हा तीच परिस्थिती ओढवल्याचे भुतेकर यांनी सांगितले. तांदळाचा दर्जा नेमका कोण तपासतं आणि वारंवार तक्रारी होऊनही कंत्राटदारावर कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला.
जिल्हाभरातील रेशन धान्याची स्वतंत्र समितीमार्फत तपासणी करावी, तांदळाचे नमुने अधिकृत प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा आणि लाभार्थ्यांना तातडीने चांगले धान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली. संबंधित कंत्राटदाराचे कंत्राट रद्द करावे, जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून विभागीय चौकशी करावी आणि दोषींवर नियमानुसार गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी आहे. प्रत्यक्ष कारवाई झाली नाही, तर अन्नाच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भुतेकर यांनी दिला.





Total Users : 3723218