spot_img
spot_img

पणत्यांना गर्दी, फटाक्यांकडे पाठ! मलकापूर पांग्राच्या दिवाळी बाजारात दुष्काळाची झळ आठवडी बाजार गजबजला, पण खरेदी मोजकीच; फटाके विक्रेते ग्राहकांच्या प्रतीक्षेत!

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) मलकापूर पांग्राच्या गुरुवारच्या आठवडी बाजारात दिवाळी खरेदीसाठी तुफान गर्दी उसळली. एका बाजूला पणत्या, रांगोळी आणि पूजेच्या साहित्याच्या दुकानांवर ग्राहकांची लगबग होती, तर दुसरीकडे फटाक्यांच्या दुकानांत शुकशुकाट होता. रविवार, ८ नोव्हेंबरच्या लक्ष्मीपूजनासाठी बाजार सजला, पण दुष्काळाची झळ खरेदीतही दिसली.

सकाळपासूनच महिला आणि कुटुंबांची बाजारात वर्दळ होती. लक्ष्मीमूर्ती, तेल, वाती, कापूर, उदबत्ती आणि फराळाच्या साहित्याला ग्राहकांनी प्राधान्य दिले. आकाशकंदील, तोरणे, सजावटीच्या माळा आणि नव्या कपड्यांनी बाजाराला सणाचा रंग चढवला. मात्र, गर्दीच्या तुलनेत खरेदी मोजकीच होती. घरच्या पूजेसाठी आणि फराळासाठी लागणारे सामान घेण्यावर अनेकांचा भर होता.

पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला. हंगामातून अपेक्षित उत्पन्न हातात न आल्याने शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या दिवाळीच्या बजेटलाही कात्री लागली. त्याचा परिणाम बाजारात जाणवला. सणाची तयारी सुरू असली तरी खरेदी करताना अनेक कुटुंबांनी हात आखडता घेतला.

फटाक्यांची दुकाने सजली, ग्राहकांची वाट पाहत बसले विक्रेते!

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फटाक्यांच्या दुकानांकडे ग्राहकांची पावले कमी वळली. विक्रेत्यांनी दुकाने सजवून विविध फटाके मांडले होते, तरी अपेक्षित गर्दी झाली नाही. वाढता खर्च आणि दुष्काळामुळे अनेक कुटुंबांनी फटाक्यांवरील खर्चाला कात्री लावल्याचे चित्र होते. बाजाराच्या एका टोकाला पूजेच्या साहित्याची खरेदी जोरात सुरू होती, तर फटाक्यांच्या दुकानांवर व्यापाऱ्यांची प्रतीक्षा कायम होती.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!