मेहकर (हॅलो बुलढाणा) ‘शेतकऱ्यांना पाणी द्या, तुम्ही सोडा नाहीतर आम्ही सोडतो!’ असा इशारा देत आमदार सिद्धार्थ खरात यांनी हजारो शेतकरी आणि शिवसैनिकांसह काढलेल्या धडक मोर्चाला यश मिळाले. गुरुवारी, ५ नोव्हेंबरला पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत पेनटाकळी धरणातील शिल्लक पाणी सिंचनासाठी सोडण्याचे निर्देश देण्यात आले.
मोर्चातून शेतकऱ्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणाऱ्या खरातांनी बैठकीतही तितक्याच ताकदीने पाण्याचा हिशेब मांडला. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि तांत्रिक वजावट केल्यानंतर उरणारे पाणी सहा कोल्हापुरी बंधाऱ्यांमार्फत शेतीला द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील सुमारे एक हजार हेक्टर शेतीलाही सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी आग्रह धरला. तूर आणि हळदीची पिके अंतिम टप्प्यात असल्याने पाणी सोडण्यास विलंब परवडणार नाही, ही बाबही त्यांनी बैठकीत अधोरेखित केली.
पेनटाकळीच्या कालव्याचे अपूर्ण काम मार्गी लागल्यास सुमारे साडेचार हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळू शकतो. खरातांच्या पाठपुराव्यानंतर या कामाबाबतही कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. कासारखेड, पिंपळगावसह बुडीत क्षेत्रातील गावांच्या पाणीपुरवठ्याच्या खंडित जोडण्या तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.
खरातांनी पेनटाकळीसोबतच मेहकर-लोणारमधील इतर जलसाठ्यांचाही प्रश्न बैठकीत मांडला. आवश्यक आरक्षण वजा करून उपलब्ध पाण्यातून प्रत्येक पिकाला किमान एक पाणी मिळावे, या मागणीलाही बैठकीत मान्यता मिळाली.
रस्त्यावर शेतकऱ्यांसोबत उभे राहून आणि बैठकीत गावनिहाय प्रश्न मांडून खरातांनी प्रशासनाकडून ठोस निर्देश मिळवले. आता शुक्रवारी, ६ नोव्हेंबरला जलसाठे आणि पाणीवाटपाचा सविस्तर आढावा होणार आहे. पाणी प्रत्यक्ष शेतात कधी पोहोचणार, याकडे मेहकर-लोणारच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





Total Users : 3721010