spot_img
spot_img

कार्डाच्या सक्तीला ब्रेक, सवलतीला हिरवा कंदील! ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर महिलांना NCMC कार्डाशिवाय एसटीत सवलत

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर)
एसटीच्या सवलतीसाठी लागणारं NCMC कार्ड अजून काढलं नाही? मग ही बातमी तुमच्यासाठी! ७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या काळात महिला प्रवाशांना NCMC कार्डाशिवाय एसटी प्रवासातील सवलतीचा लाभ घेता येणार आहे. १ ऑक्टोबरपासून लागू झालेली कार्डाची सक्ती एसटी महामंडळाने या कालावधीपुरती शिथिल केली आहे.

१.१० कोटी कार्डांची नोंदणी आणि वितरण झालं, तरी खेड्यापाड्यांत अनेक महिला अजून प्रतीक्षेत! महामंडळाच्या पत्रानुसार, ग्रामीण भागातील अनेक महिलांपर्यंत कार्डाची पुरेशी माहिती पोहोचलेली नसल्याने त्यांची नोंदणी बाकी आहे. ही बाब लक्षात घेऊन महामंडळाने सवलतीसाठी कार्ड दाखवण्याची अट तात्पुरती शिथिल केली आहे.

आता कार्ड नोंदणीसाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून ही शिबिरे घेतली जाणार आहेत. वर्षअखेरपर्यंत सर्व पात्र महिलांची नोंदणी करून त्यांना कार्ड वितरित करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने ठेवले आहे.

महामंडळाच्या वाहतूक विभागाच्या महाव्यवस्थापकांनी ४ नोव्हेंबरच्या पत्राद्वारे संबंधित विभाग नियंत्रक आणि प्रादेशिक व्यवस्थापकांना याबाबत सूचना दिल्या आहेत. ज्या महिलांकडे अद्याप कार्ड नाही, त्यांनी ३१ डिसेंबरची वाट न पाहता मुदतीत नोंदणी करून कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जळगाव जामोद एसटी आगाराचे व्यवस्थापक मुकुंद न्हावकर यांनी केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!