मलकापूर (हॅलो बुलढाणा/करन झनके) वाढदिवसाच्या नावाखाली बॅनरबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि ढोलताशांवर खर्च करण्याऐवजी गरजूंच्या मदतीसाठी पुढे या, असे आवाहन भाई अशांत वानखडे यांनी केले आहे. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती आणि मलकापुरात तरुणावर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी समर्थकांना सामाजिक भान जपण्याचे आवाहन केले.
मलकापूर नगरपरिषदेचे शिक्षण सभापती तथा समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई अशांत वानखडे यांचा २५ ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे. यानिमित्त कुणीही बॅनर लावू नयेत, फटाके फोडू नयेत, ढोलताशे किंवा इतर वाद्यांचा गजर करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
वैयक्तिक कारणास्तव बाहेरगावी जाणार असल्याने शुभेच्छा देण्यासाठी प्रत्यक्ष भेटीला येऊ नये. हार, तुरे, शाल किंवा बुके आणू नयेत, असेही त्यांनी समर्थकांना कळविले आहे.
सध्याची परिस्थिती लक्षात घेता उत्सवावरील अनावश्यक खर्च टाळून गरजू व्यक्तींना मदत करणे अधिक आवश्यक असल्याची भूमिका त्यांनी मांडली. वाढदिवसासाठी राखून ठेवलेला पैसा मदतीच्या कामी लावावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.
गरजूंच्या मदतीसाठी उचललेले पाऊल हीच आपल्यासाठी वाढदिवसाची खरी भेट ठरेल, अशी भावना वानखडे यांनी व्यक्त केली. जल्लोषाच्या तयारीऐवजी मदतीच्या कृतीला प्राधान्य देण्याचा संदेश त्यांच्या आवाहनातून देण्यात आला आहे. समर्थकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत अनावश्यक खर्च टाळावा आणि सामाजिक बांधिलकी जपत गरजू नागरिकांना मदतीचा हात द्यावा, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.






Total Users : 3650951