बुलढाणा (हॅलो बुलढाणा) रस्त्यांवरील अपघात आणि त्यात जाणारे जीव रोखण्यासाठी प्रभावी वाहन तपासणी, वाहतूक नियमांचे पालन आणि सातत्यपूर्ण कार्यवाहीवर भर द्या! प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी ५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट देत रस्ता सुरक्षेबाबत स्पष्ट निर्देश दिले. प्रशासकीय कामकाजासह महसूल उद्दिष्ट आणि पूर्ततेचाही त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
भुयार यांनी विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेऊन महसूल उद्दिष्टांची प्रभावी पूर्तता करण्याबाबत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. नागरिकाभिमुख सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी कार्यालयीन कामकाजात सातत्याने सुधारणा करण्यावरही भर देण्यात आला.
रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने वाहनांची प्रभावी तपासणी, वाहतूक नियमांबाबत जनजागृती आणि अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अपघातांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे भुयार यांनी सांगितले.
या आढाव्यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी रघुवीर बिलावर, मोटार वाहन निरीक्षक शितल कुमार कुंभार, सतेश तुले, मंदार टवलारकर, हेमंत गावंडे, सहाय्यक निरीक्षक निखिल ठाकूर, राजश्री चौधरी तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
महसूल उद्दिष्टपूर्तीबरोबरच सुरक्षित प्रवास आणि नागरिकांना प्रभावी सेवा देण्याची जबाबदारी या बैठकीत अधोरेखित झाली. आता या निर्देशांनुसार होणारी प्रत्यक्ष कार्यवाही आणि रस्ता सुरक्षेतील सुधारणा नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत.




Total Users : 3577462