लोणार (हॅलो बुलढाणा/राहुल सरदार) शाळेच्या विकासाच्या चर्चा तर अनेक होतात; चिंचोली सांगळेच्या ग्रामस्थांनी मात्र प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले आहे! ज्या शाळेने अक्षरओळख करून दिली, आयुष्याला दिशा दिली, त्या शाळेचे ऋण फेडण्यासाठी संपूर्ण गाव एकवटले आहे. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या सुशोभीकरणासाठी लोकवर्गणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रंगरंगोटी आणि आवश्यक दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
‘आपली शाळा, आपली जबाबदारी’ ही भावना घेऊन माजी विद्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि शिक्षकांनी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांना प्रसन्न वातावरण आणि शिक्षणासाठी पूरक सुविधा मिळाव्यात, यासाठी ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे.
विशेष म्हणजे, शिक्षकांची तळमळ आणि शाळेसाठी सुरू असलेली धडपड पाहून गावकरी स्वतःहून सरसावले. लोकवर्गणी गोळा करण्याची जबाबदारीही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यामुळे शाळेच्या विकासाचे काम आता गावाच्या सामूहिक जिद्दीचे प्रतीक बनले आहे.
यात माजी विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षवेधी ठरत आहे. विविध क्षेत्रांत स्थिरावलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या जडणघडणीचा पाया घालणाऱ्या शाळेसाठी योगदान देण्याची भावना व्यक्त केली आहे. बालपणीच्या वर्गखोल्यांशी जोडलेले नाते कृतीतून जपण्याची संधी या उपक्रमाने उपलब्ध करून दिली आहे. पुढील पिढीला चांगले वातावरण देण्याचा संकल्प गावाच्या या एकजुटीतून पुढे येत आहे.
बदलणारा शाळेचा परिसर पाहून पालकांमध्ये समाधान आहे. मुलांच्या भविष्यासाठी गावाने दाखवलेली ही बांधिलकी इतर गावांसमोरही प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
या उपक्रमाला सहकार्य करणारे माजी विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, दानशूर व्यक्ती आणि व्यवस्थापन समितीचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी आभार मानले आहेत













Total Users : 3810372