जळगाव जामोद/बुलढाणा (हॅलो बुलढाणा) २२ वर्षीय गर्भवती सादुरी राधेश्याम खरात हिला सर्पदंश झाल्यानंतर रस्ता नसल्याने चादर-बांबूच्या झोळीतून तब्बल तीन किलोमीटर पायी न्यावे लागले… उपचारासाठी जळगाव जामोद, खामगाव आणि पुढे अकोल्याकडे धावपळ झाली; मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. या विदारक घटनेला महिना उलटत असतानाही चाळीसटपरीतील रस्ता आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न कायम असल्याचा आरोप करत ग्रामस्थ आता बेमुदत आंदोलनावर बसले आहेत.
ही हृदयद्रावक घटना ‘हॅलो बुलढाणा’ने जिल्ह्यातून सर्वप्रथम प्रसारित केली होती. मात्र ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अद्याप त्यांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे “आणखी किती जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार?” असा थेट सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
भिंगारा ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या अतिदुर्गम चाळीसटपरी पाड्यापर्यंत पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात परिस्थिती अत्यंत बिकट होते. सादुरीला सर्पदंश झाल्यानंतर रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यात झालेला विलंब आणि आवश्यक उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनापुढे मागण्यांची मोठी यादी ठेवली आहे. भिंगारा ते गोमाल पक्का रस्ता तातडीने पूर्ण करावा, भिंगारा आरोग्य उपकेंद्र २४ तास सुरू ठेवावे, डॉक्टर-नर्स, रुग्णवाहिका आणि Anti-Snake Venom उपलब्ध करावे, जळगाव जामोद शासकीय रुग्णालयात सर्पदंश व रेबीजवरील औषधे कायम उपलब्ध ठेवावीत, अशी प्रमुख मागणी आहे.
यासोबतच पीडित कुटुंबाला भरीव आर्थिक मदत, वनपट्ट्यांचे वाटप, चाळीसटपरीतील शाळा-अंगणवाडीचे बांधकाम, तीनही गावांना वीजपुरवठा तसेच इतर प्रलंबित रस्त्यांची कामे तातडीने करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, “मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा फलक आहे; मग प्रत्यक्ष रस्ता गेला कुठे?” असा खडा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
आता चाळीसटपरीचा आवाज निवेदनापुरता राहिलेला नाही. ग्रामस्थ बेमुदत आंदोलनावर बसले असून, मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.‘सादुरी परत येणार नाही… पण दुसरी सादुरी झोळीतून जाऊ नये!’ हीच या आंदोलनाची सर्वात अस्वस्थ करणारी हाक ठरत आहे.











Total Users : 3527495