बुलढाणा (हॅलो बुलढाणा) गणेशोत्सव जवळ आला की प्रशासनाला अचानक ध्वनिप्रदूषणाची आठवण कशी होते? डीजेवर बंदी घालायची असेल तर ती केवळ गणेशोत्सवापुरती मर्यादित न ठेवता लग्नसमारंभ, वैयक्तिक कार्यक्रम, राजकीय सभा आणि सर्व धार्मिक उत्सवांसाठी सरसकट लागू करा, अशी रोखठोक भूमिका चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी मांडली. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्यभर गाजत असलेल्या ‘डीजेमुक्त उत्सवा’च्या चर्चेला आता नवे राजकीय वळण मिळाले आहे.
पुण्यातील विद्यानंद बापट यांनी सुरू केलेल्या डीजेमुक्त चळवळीची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा येथे आयोजित जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीतही डीजे आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. प्रशासकीय अधिकारी, राजकीय प्रतिनिधी आणि शांतता समितीच्या सदस्यांनी डीजेमुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत मतप्रदर्शन केले.
याचवेळी आमदार श्वेता महाले यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर थेट सवालांची सरबत्ती केली. “गणेशोत्सव आला कीच डीजेबंदीची चर्चा का सुरू होते? लग्न, वाढदिवस, खासगी समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांमध्येही मोठ्या आवाजात डीजे वाजविला जातो. काही भोंगे तर नागरिकांना दररोज त्रास देतात; मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
डीजेचा कर्णकर्कश आवाज आरोग्यासाठी घातक असेल तर कारवाईमध्ये कोणताही दुजाभाव नको. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. केवळ गणेश मंडळांना लक्ष्य करणे योग्य नाही, असेही महाले यांनी ठणकावले.
“बंदी घालायचीच असेल तर केवळ गणेशोत्सवात नव्हे, तर वर्षभर आणि सर्व कार्यक्रमांतील डीजेवर सरसकट बंदी घाला,” या त्यांच्या विधानाने शांतता समितीची बैठक चांगलीच तापली. आता प्रशासन महालेंच्या सवालाला काय उत्तर देते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.













Total Users : 3393801