बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यासाठी देण्यात येणारा सन २०२३-२४ चा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ जिल्हास्तरीय पुरस्कार ॲड. सौ. वृषालीताई राहुल बोंद्रे यांना गुरुवार ३ सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला.
वृषालीताई बोंद्रे यांनी हिरकणी महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, दारूबंदी चळवळ तसेच विविध सामाजिक उपक्रम व चळवळींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, सामाजिक जागृती आणि समाजहितासाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासोबतच त्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने पुढे नेण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची शासनाने दखल घेत हा पुरस्कार प्रदान केला आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता. मात्र, त्याच काळात बोंद्रे परिवारातील काही दुखद घटनांमुळे वृषालीताई बोंद्रे यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहता आले नव्हते.त्यामुळे पुरस्कार स्वीकारण्याचा सोहळा 3 सप्टेंबर रोजी पार पडला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे यांच्या हस्ते त्यांनी हा सन्मान स्वीकारला. यावेळी शारदाताई वानेरे, ज्योतिताई फिसके, प्रकाश लकडे, गोपाल म्हस्के व इतर स्नेही उपस्थित होते. वृषालीताई बोंद्रे यांच्या या सन्मानाबद्दल अनुराधा व हिरकणी परिवारासह सामाजिक, राजकीय, महिला आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
▪️महिलांसाठी काम करत आलो, काम करत राहू : ॲड.वृषालीताई बोंद्रे!
महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार मिळणे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेल्या २५ वर्षांपासून हिरकणी व अनुराधा परिवाराच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रात महिलांना संधी मिळावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढावा, हा नेहमीच केंद्रबिंदू राहिला असल्याचे सौ.वृषालीताई राहुल बोंद्रे म्हणाल्या.गौरी सजावट स्पर्धा, महिला दिन, हळदी-कुंकू, मातृदिन, योग शिबिरे तसेच दारूबंदी व व्यसनमुक्ती जनजागृतीसारख्या उपक्रमांना महिलांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हीच आमच्या कार्याची खरी प्रेरणा आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी विचारांचा आदर्श समोर ठेवून महिलांसाठी काम करत आले आहे आणि यापुढेही अधिक व्यापक स्वरूपात काम करत राहू, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.













Total Users : 3393355