जानेफळ (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला उत्तराऐवजी मारहाण मिळणार असेल, तर शिक्षणाच्या मंदिरात मुलांनी विश्वास ठेवायचा कोणावर? मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयात दहावीच्या १५ वर्षीय विद्यार्थ्याला अमानुष मारहाण झाल्याच्या प्रकरणात आता पोलिसांनी शिक्षक राहुल जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘हॅलो बुलढाणा’ने सर्वप्रथम हे प्रकरण प्रसारित करून विद्यार्थ्यावरील कथित अत्याचाराला वाचा फोडली होती. आता गुन्हा दाखल झाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
पालकांच्या तक्रारीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास हिंदी विषयाचा तास सुरू असताना विद्यार्थ्याने पुस्तकावरील मोबाईल क्रमांकाबाबत शिक्षकांना प्रश्न विचारला. ‘दहा वेळा शून्य हा मोबाईल क्रमांक असू शकतो का?’ एवढे विचारल्याने संतापलेल्या शिक्षक राहुल जाधव यांनी विद्यार्थ्याच्या तोंडावर, पाठीवर आणि कानावर चापटा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. ढकलून दिल्याने कानामागेही दुखापत झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मारहाणीपुरताच हा प्रकार थांबला नसल्याचा आणखी गंभीर आरोप समोर आला आहे. जखमी विद्यार्थ्याला घरी जाऊ न देता सायंकाळी साडेचार ते पाचपर्यंत वर्गात डांबून ठेवल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ‘घरी गेल्यावर आई-वडिलांना सांगू नको’, अशी दमदाटी अन्य दोन शिक्षकांनीही केल्याचे विद्यार्थ्याने सांगितल्याची नोंद तक्रारीत आहे. या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
शाळा सुटल्यानंतर घरी पोहोचलेल्या विद्यार्थ्याने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. पाठीवरील निळसर-हिरवट वळ आणि चेहऱ्यावरील व कानामागील दुखापती पाहून पालकांनी त्याला जानेफळ येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याच रात्री पोलीस ठाण्यात जाऊन तोंडी तक्रार दिल्याचे पालकांनी नमूद केले आहे. दुसऱ्या दिवशी चक्कर येत असल्याने विद्यार्थ्याला बुलढाणा येथे वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले.
वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्याच्या वडिलांनी ३१ ऑगस्ट रोजी जानेफळ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. उपलब्ध माहितीनुसार, त्याआधारे पोलिसांनी शिक्षक राहुल जाधव यांच्याविरुद्ध संबंधित दंडात्मक तरतुदींसह बालकांची काळजी व संरक्षणविषयक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार शरद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
प्रश्न विचारणे हा विद्यार्थ्याचा अपराध आहे का? शिस्तीच्या नावाखाली मारहाणीचे समर्थन कसे होऊ शकते? आणि जखमी मुलाला गप्प राहण्यास सांगितल्याचा आरोप खरा ठरल्यास, ती जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची उत्तरे शाळा प्रशासन आणि शिक्षण विभागाने देण्याची गरज आहे.
पालकांनी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. केवळ गुन्हा नोंदवून विषय संपणार नाही; विद्यार्थ्याला निर्भयपणे शिक्षण घेता येईल, अशी खात्रीही मिळायला हवी. संबंधित शिक्षक व शाळा प्रशासनाची बाजू उपलब्ध नाही. आरोपांची सत्यता आणि प्रत्येकाची भूमिका पोलीस तपासातून स्पष्ट होईल. आता शिक्षण विभाग कोणती दखल घेतो, याकडे लक्ष लागले आहे.













Total Users : 3383422