घाटबोरी (हॅलो बुलढाणा) केक कापून, हारतुरे स्वीकारून वाढदिवस साजरा करण्याच्या दिखाऊ पद्धतीला फाटा देत साहित्यिक संतोष अवसरमोल यांच्या वाढदिवसानिमित्त घाटबोरीत शिक्षण, संस्कार आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा जागर करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गावकऱ्यांच्या वतीने पवित्र तुळशीची रोपे, तर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. ‘एका हातात ज्ञानाची वही आणि दुसऱ्या हातात संस्कारांची तुळस’ ही संकल्पना या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली.
जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार शरद माळी यांनी अवसरमोल यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, “संतोष अवसरमोल यांच्या लेखणीची खरी ताकद केवळ शब्दांत नाही; त्या शब्दांच्या माध्यमातून माणसं जोडण्यात आहे. लेखणीच्या धाग्यांनी नाती गुंफत समाजहिताची जाणीव जागविणारे ते संवेदनशील व्यक्तिमत्त्व आहेत.” या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या हातात शिक्षणाचे साधन देतानाच त्यांच्या मनात संस्कार, पर्यावरणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीची बीजे रोवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विष्णुपंत पाखरे होते. डोणगावचे ठाणेदार गणेश इंगोले, जानेफळचे ठाणेदार शरद माळी, वनपरिक्षेत्र अधिकारी अंकुश येवले, केंद्रप्रमुख विनोद ढवळे, सरपंच राजकुमार पाखरे, माजी सरपंच गजानन चनेवार, शेषराव अंभोरे, संतोष डोबळे, मुख्याध्यापक रमेश सिरसाट, पी. पी. देशमुख आणि राजू नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते वह्या आणि तुळशीच्या रोपांचे वाटप होताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. वाढदिवस केवळ स्वतःच्या आनंदाचा नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस ठरू शकतो, असा प्रभावी संदेश घाटबोरीतील या विधायक उपक्रमाने दिला.













Total Users : 3378304