spot_img
spot_img

शेती महापुराने ‘खाल्ली’; उरलेला हक्क ‘२० आर’चा निकष गिळणार? प्रतीकात्मक प्रेतासमोर प्रश्नांचा ढीग; जळगाव जामोदमध्ये प्रशासनाला ‘लेखी उत्तर’ मागितले!

जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) महापुराने शेती खरडून नेली, आता पंचनाम्यांतील कथित निकष शेतकऱ्यांचे हक्क हिरावणार का? ‘पोटखराब वर्ग (अ)’ आणि कथित २० आर निकषाभोवती निर्माण झालेल्या संभ्रमाविरोधात सोमवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनोखे व आक्रमक लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलक प्रकाश विठ्ठलराव भिसे यांच्या नेतृत्वाखाली प्रतीकात्मक शेतकऱ्याचे प्रेत ठेवून त्यावर प्रश्नांचे फलक लावण्यात आले.

 

पूरग्रस्त शेतीचे पंचनामे करताना “२० आरपेक्षा जास्त क्षेत्र खरडून गेल्यास ते ‘पोटखराब वर्ग (अ)’मध्ये जाईल,” असे काही शेतकऱ्यांना सांगितले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मात्र महसूल प्रशासनासोबतच्या चर्चेत नायब तहसीलदारांनी असा कोणताही आदेश नसून ही माहिती अफवा असल्याचे सांगितल्याचा दावा आंदोलकांनी केला.

मग हा २० आरचा निकष पंचनाम्यांमध्ये आणला कुणी? त्याचा कायदेशीर आधार काय? शेतकऱ्यांना चुकीची माहिती देणाऱ्यांवर कारवाई होणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती आंदोलकांनी प्रशासनावर केली.

पंचनाम्यांसाठी दिलेल्या लेखी आदेशांच्या प्रमाणित प्रती, संबंधित शासन निर्णय व परिपत्रके, ‘पोटखराब वर्ग (अ)’चे कायदेशीर निकष आणि कथित २० आरच्या अटीचा आधार तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. “तोंडी माहिती नको; लेखी आदेश दाखवा! अफवा असेल तर ती पसरविणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली.

हा विषय केवळ नुकसानभरपाईचा नसून जमिनीच्या नोंदी, मालकी हक्क आणि भविष्यातील शेती वापराशी संबंधित असल्याचे प्रकाश भिसे यांनी सांगितले. आंदोलनात विजय ठाकरे, प्रा. नितीन घोपे, तुकाराम गटमने, वसंत मिरगे, संजय भुजबळ, वासुदेव राजनकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.प्रशासनाने तातडीने लेखी खुलासाकेल्यास आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!