जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा) स्वातंत्र्याच्या आठ दशकांनंतरही गावाला पक्का रस्ता नाही… जवळच्या रुग्णालयात सर्पदंशावरील पुरेशा उपचारांची सोय नाही… अन् मृत्यूशी झुंजणाऱ्या २२ वर्षीय गर्भवती महिलेला चादर आणि बांबूच्या झोळीतून रुग्णालयापर्यंत न्यावे लागते! जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासीबहुल चाळीस टपरी येथे समोर आलेल्या या विदारक घटनेने विकासाच्या दाव्यांवरच गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
चाळीस टपरी येथील सादुरी राधेश्याम खरात (वय २२) या गर्भवती महिलेला २५ ऑगस्ट रोजी सर्पदंश झाला. गावातून बाहेर जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी चादर व बांबूची झोळी तयार करून तिला प्रथम भिंगारा येथे आणले. तेथून तिला जळगाव जामोद येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.
मात्र तेथे आवश्यक उपचार उपलब्ध नसल्याचे सांगत तिला खामगावला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्यानंतर खामगाव उपजिल्हा रुग्णालयातून तिला तातडीने अकोला येथे नेण्यास सांगण्यात आले; मात्र मृत्यूशी सुरू असलेली तिची झुंज अपयशी ठरली आणि वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या मृत्यूची जबाबदारी कुणाची?
चाळीस टपरी गावाला आजही ये-जा करण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात गावाचा बाहेरील जगाशी संपर्क जवळपास तुटतो. त्यामुळे आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि वृद्धांना झोळीतून नेण्याची अमानवी वेळ ग्रामस्थांवर येते. जळगाव जामोद येथील आरोग्य व्यवस्थेत ऑक्सिजन, अतिदक्षता विभाग आणि सर्पदंशावरील तातडीच्या उपचारांसारख्या आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एका गर्भवती महिलेला वेळेत उपचार मिळू शकले नाहीत आणि रुग्णालयांच्या फेऱ्यांमध्ये तिचा जीव गेला, ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही; तर रस्ता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित असलेल्या संपूर्ण आदिवासीबहुल भागाची वेदना आहे. विकासाचे ढोल बडविणाऱ्या लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने आता या मृत्यूकडे केवळ आकडा म्हणून पाहू नये, अशी संतप्त मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक लक्ष घालावे!
बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन स्वतः वैयक्तिक लक्ष घालावे. चाळीस टपरी गावाला कायमस्वरूपी पक्का रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांना कालबद्ध आदेश द्यावेत. तसेच जळगाव जामोद परिसरातील आरोग्य सुविधांची वस्तुनिष्ठ तपासणी करून सर्पदंशावरील तातडीचे उपचार, ऑक्सिजन आणि आपत्कालीन रुग्णवाहिका व्यवस्था सक्षम करावी.
मृत सादुरी खरात या गर्भवती बहिणीला केवळ शाब्दिक श्रद्धांजली नको; चाळीस टपरीला पक्का रस्ता आणि सक्षम आरोग्यव्यवस्था उपलब्ध करून देणे हीच तिला खरी श्रद्धांजली ठरेल!











Total Users : 3348156