जानेफळ (हॅलो बुलढाणा) मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द येथील एका नामांकित विद्यालयात विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत तन्मय समाधान खंडागळे हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण करणाऱ्या शिक्षकाचे नाव राहुल जाधव असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका नामांकित विद्यालयात राहुल जाधव हे वर्गात शिकवण्यासाठी आले असताना,
विद्यार्थी तन्मय खंडागळे याने ‘दहा वेळा शून्य हा मोबाईल क्रमांक असू शकतो का?’ हा प्रश्न विचारल्यामुळे शिक्षक राहुल जाधव यांचा राग अनावर झाला व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर तन्मय खंडागळेला जबर मारहाण केल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी बुलढाणा येथे दिलेल्या तक्रारीत केला आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर आणि चेहऱ्यावर कानामागे, डोक्यावर जबर मारहाणीच्या खुणा दिसून येत आहेत. घटनेनंतर विद्यार्थ्यांचे वडील समाधान रामराव खंडागळे रा.मारुती पेठ ता. मेहकर यांनी जानेफळ पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी जानेफळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सदर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विद्यार्थ्याला पाठवल्याची माहिती त्याच्या वडीलांनी दिली आहे. या घटनेने विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षणाच्या मंदिरात विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण मिळणे अपेक्षित असताना शिक्षकाकडूनच विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचा आरोप झाल्याने या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी जानेफळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून मारहाणीचे नेमके कारण, घटनेची परिस्थिती आणि संबंधित शिक्षकाची भूमिका तपासातून स्पष्ट होणार आहे.
विद्यार्थ्याला झालेल्या मारहाणीची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत शाळा प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
दरम्यान या प्रकरणात पोलिस तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि संबंधित शिक्षकावर कोणती कारवाई केली जाते, याकडे पालकांसह परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
संबंधित शिक्षकाची बाजू, घटनेचे नेमके कारण आणि पोलिस तपासातील निष्कर्ष अधिकृतरीत्या समोर आल्यानंतरच प्रकरणाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.











Total Users : 3344167