spot_img
spot_img

मंत्र्यांचे बंगले-गाड्या लिलावाचा इशारा देताच सरकारची तारांबळ! पोलिसांनी बजावली तुपकरांना नोटीस! तुपकर म्हणाले.. मुंबईत आंदोलन होणारच; नोटिसांना घाबरत नाही!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी कडक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६८ अन्वये ही नोटीस देण्यात आली असून, आंदोलनादरम्यान कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.

विशेष म्हणजे, बुलढाणा शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः तुपकरांना ही नोटीस बजावली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास २७ ऑगस्टला मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने प्रतीकात्मकरीत्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने आता आंदोलन आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

▪️पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमके काय?

२३ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी तुपकरांना आंदोलनादरम्यान दखलपात्र गुन्हा घडेल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करू नये, असे बजावले आहे. तसेच शासकीय बंगले, कार्यालये किंवा शासकीय वाहनांबाबत अनधिकृत ताबा, अडथळा, नुकसान अथवा प्रत्यक्ष कृती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, काही अनुचित प्रकार झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “अशा नोटीसा आम्हाला नवीन नाहीत. अशा नोटीसींना आम्ही भीक घालत नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला आंदोलनाचा आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही,” असा थेट पलटवार तुपकरांनी केला.
‘काहीही झाले तरी मुंबईत आंदोलन होणारच!’
सरकार आणि प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकरांनी स्पष्ट केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!