spot_img
spot_img

मध्यरात्री महामार्गावर अपघाताचा आवाज… अन् मदतीसाठी सर्वांत आधी धावतात ‘ते’! शेकडो जखमींसाठी देवदूत ठरलेल्या बुद्धू चौधरींचा स्वातंत्र्यदिनी गौरव

सिंदखेडराजा (हॅलो बुलढाणा/वसीम शेख) नागपूर-मुंबई महामार्गावर अपघात झाल्याचा एक फोन येतो… रात्र कितीही झाली असो, वेळेची आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळाकडे धाव घेणारे पत्रकार तथा समाजसेवक बुद्धू चौधरी! महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी संकटमोचक ठरलेल्या त्यांच्या अविरत सेवाकार्याची प्रशासनाने दखल घेतली आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

महामार्गावर होणाऱ्या अपघातांमध्ये प्रत्येक क्षण अत्यंत महत्त्वाचा असतो. अनेकदा रात्रीच्या वेळी मदत मिळण्यास उशीर होतो. जखमी वेदनेने विव्हळत असताना आणि घटनास्थळी उपस्थित नागरिक मदतीसाठी धडपडत असताना बुद्धू चौधरी तत्काळ तेथे पोहोचतात. जखमींना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे, रुग्णवाहिका बोलावणे, रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणे तसेच पोलीस आणि संबंधित यंत्रणांशी संपर्क साधणे—ही जबाबदारी ते कोणत्याही अपेक्षेविना पार पाडत आहेत.

त्यांच्या याच माणुसकीपूर्ण कार्याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुनराव ठोंबरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी (महसूल) प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर, मुख्याधिकारी बोबडे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, माजी नगराध्यक्ष देवदास ठाकरे आणि सतीश तायडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

“हा सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नाही; समाजासाठी आणखी जोमाने कार्य करण्याची जबाबदारी आहे. अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळवून देण्यासाठी माझे सेवाकार्य अखंड सुरू राहील,” असा निर्धार बुद्धू चौधरी यांनी व्यक्त केला.

महामार्गावर अनेक जखमींसाठी ‘गोल्डन अवर’मध्ये मदतीचा हात ठरणाऱ्या बुद्धू चौधरींच्या या कार्याचे सिंदखेडराजासह संपूर्ण परिसरातून कौतुक होत आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!