spot_img
spot_img

CRIME NEWS! बुलढाण्याच्या ‘या’ नगरसेवकाच्या गोठ्यात रात्रीतून घडलं तरी काय? पहाटे दरवाजा उघडताच दोर दिसले… पण ‘मेंऽऽ’ आवाज गायब!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरालगतच्या हतेडी बु. शिवारात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत दोन गोठ्यांमधील तब्बल १८ लहान-मोठ्या बकऱ्या चोरून नेल्याची घटना १७ ऑगस्टच्या पहाटे उघडकीस आली. चोरीस गेलेल्या बकऱ्यांची एकूण किंमत अंदाजे ८५ हजार रुपये असून, या घटनेने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुलढाणा शहरातील नगरसेवक उदय भास्कराव देशपांडे (वय ५९, रा. केशवनगर, बुलढाणा) यांची केसापूर रोडवरील हतेडी बु. शिवारातील गट क्रमांक ५ मध्ये चार एकर शेती आहे. त्यांच्या शेतातील गोठ्यात सहा बकऱ्या बांधलेल्या होत्या. १७ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ ते पहाटे ५.१५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी गोठ्यात प्रवेश करून या सहाही बकऱ्या लंपास केल्या. त्यांची अंदाजित किंमत ३० हजार रुपये आहे.

चोरट्यांनी एवढ्यावरच न थांबता याच परिसरातील योगेश वसंतराव ढवळे यांच्या टिनशेडलाही लक्ष्य केले. तेथील तब्बल १२ बकऱ्या चोरून नेल्या. या बकऱ्यांची अंदाजित किंमत ५५ हजार रुपये आहे. परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला; मात्र बकऱ्यांचा अथवा चोरट्यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.

उदय देशपांडे यांच्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.

एका रात्रीत दोन गोठ्यांवर डल्ला मारून १८ बकऱ्या घेऊन पसार झालेली ही ‘बकरी गँग’ नेमकी कोण? बकऱ्या नेण्यासाठी चोरट्यांनी वाहनाचा वापर केला का? त्यांनी आधीच परिसराची रेकी केली होती का? या प्रश्नांची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणार आहेत. आता या ‘बकरी गँग’च्या मुसक्या पोलीस कधी आवळतात, याकडे पशुपालकांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!