बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी पैसे खर्च करून लायब्ररी व अभ्यासिकांमध्ये जात आहेत. घरच्या वातावरणात अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने आई-वडील आपल्या पाल्याने लायब्ररीमध्ये जाऊन मन लावून अभ्यास करावा, मेहनत घ्यावी आणि भविष्यात स्वतःचे करिअर घडवावे, अशी अपेक्षा ठेवतात. मात्र काही ठिकाणी या अपेक्षेला तडा जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
काही लायब्ररींच्या परिसरात विद्यार्थी अभ्यासाऐवजी मोबाईलवर व्यस्त असल्याचे, मित्र-मैत्रिणींसोबत बराच वेळ गप्पा मारणे, हेडफोन लावून फोनवर बोलणे, व्हिडिओ कॉल करणे तसेच चॅटिंगमध्ये वेळ घालवणे असे प्रकार दिसून येतात. अशा प्रकारे दोन-तीन तास किंवा त्याहून अधिक मौल्यवान वेळ वाया जाण्याची शक्यता असून, पालकांनी आपल्या पाल्याच्या अभ्यासातील प्रगतीकडे तसेच लायब्ररीतील वेळेच्या योग्य वापराकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.
दरम्यान, काही लायब्ररी संचालकांकडून ‘आम्हाला पैसे मिळतात, त्यांचा वापर कसा करायचा हा त्यांचा प्रश्न’ अशा प्रकारची भूमिका घेतली जात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण मिळणे आणि पालकांनीही त्यांच्याशी संवाद ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. माजी छेडछाडविरोधी पथक प्रमुख तथा महाराष्ट्र शासन जिल्हा युवक पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते आणि समुपदेशक प्रभाकर वाघमारे यांनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.
“लायब्ररीमध्ये आपल्या आयुष्याच्या करिअरची बाग फुलवा; प्रेमाची बाग फुलवून आयुष्यातील मोलाचा वेळ वाया घालवू नका. आजचा अभ्यास, मेहनत आणि योग्य दिशा हीच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची खरी पायाभरणी आहे,” असे आवाहन प्रभाकर वाघमारे यांनी केले आहे.
ते म्हणाले की, पालकांनीही केवळ लायब्ररीची फी भरली म्हणून जबाबदारी संपली असे न मानता, आपल्या पाल्याच्या अभ्यासाबाबत नियमित संवाद साधावा आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे.















Total Users : 3300304