spot_img
spot_img

‘जयेश’च्या जिद्दीला सलाम! MPSC मध्ये राज्यातून SC प्रवर्गात ३१ वे स्थान! राज्य विक्री कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदासाठी ठरला पात्र!

देऊळगाव राजा (संतोष जाधव/ हॅलो बुलढाणा) पंचायत समितीच्या माजी सभापती सौ. अनिताताई सुधाकर झोटे यांचे सुपुत्र चि. जयेश झोटे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सन २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त गट ब परीक्षेत दुहेरी यश संपादन केले आहे. आज दिनांक १४ ऑगस्ट रोजी निकाल जाहीर झाला.
जयेश झोटे यांनी या परीक्षेत राज्यातून अनुसूचित जाती (SC) प्रवर्गात ३१ वा क्रमांक पटकावला असून, राज्य विक्री कर निरीक्षक (STI) तसेच पोलीस उपनिरीक्षक (PSI) या दोन्ही पदांसाठी पात्रता मिळवली आहे.

आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करीत जयेशने जिद्दीच्या जोरावर यश प्राप्त केल्याने गावात यशाचा जल्लोष साजरा होत आहे.विशेष म्हणजे जयेशने हे यश पहिल्याच प्रयत्नात संपादन केले आहे.
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर जयेश यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेले हे यश अभिनंदनीय आहे. त्यांच्या या यशामुळे सावंगी टेकाळे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण आहे.
जयेश यांच्या यशामागे त्यांच्या आई-वडिलांचे संस्कार, मार्गदर्शन आणि अथक परिश्रम यांचा मोलाचा वाटा आहे. मुलाने प्रशासकीय सेवेत यश मिळवत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने झोटे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
“जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश मिळवता येते,” याची प्रेरणादायी प्रचिती जयेश झोटे यांनी आपल्या यशातून दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!