spot_img
spot_img

मलकापूरकरांसाठी खुशखबर! १ ऑगस्टपासून रात्री ९ वाजेपर्यंत टपाल बुकिंग; नोकरदार, व्यापारी अन् विद्यार्थ्यांना मोठा दिलासा!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूर शहरातील नागरिकांसाठी टपाल विभागाने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना नियमित कार्यालयीन वेळेनंतरही टपाल व पार्सल बुकिंग करता यावे, यासाठी मलकापूर पोस्ट ऑफिस इमारतीतील ‘मलकापूर सॉर्टिंग काउंटर’वर १ ऑगस्टपासून सायंकाळच्या विशेष बुकिंग सुविधेला प्रारंभ होणार आहे.

रेल्वे डाक सेवा, नागपूरचे अधीक्षक गणेश अंभोरे यांनी या नव्या सुविधेची घोषणा केली आहे. मलकापूर सॉर्टिंग काउंटर दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे दिवसभर कार्यालय, व्यवसाय, शिक्षण किंवा अन्य कामांमध्ये व्यस्त असणाऱ्या नागरिकांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतरही टपाल सेवा घेता येणार आहे.

या विशेष काउंटरवर स्पीड पोस्ट बुकिंग, देशांतर्गत पार्सल बुकिंग तसेच आंतरराष्ट्रीय पत्रे, पार्सल आणि ईएमएस बुकिंगची सुविधा उपलब्ध राहणार आहे. या वाढीव वेळेचा विशेष फायदा नोकरदार वर्ग, व्यापारी, विद्यार्थी आणि नियमित वेळेत पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

आगामी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा नागरिकांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे. ग्राहकांना राख्या, भेटवस्तू, महत्त्वाची कागदपत्रे आणि पार्सल सायंकाळच्या वेळेत सहजपणे बुक करता येणार आहेत. त्यामुळे देशभरातील तसेच परदेशातील नातेवाईकांपर्यंत राखी आणि भेटवस्तू वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे.

रेल्वे डाक सेवा अधीक्षक गणेश अंभोरे यांनी मलकापूर शहर व परिसरातील नागरिकांनी या विशेष सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, तसेच शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी राखी व इतर वस्तूंचे पार्सल आगाऊ बुक करावे, असे आवाहन केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!