बुलढाणा (हॅलो बुलढाणा) २२ सप्टेंबर २०२६
जिल्ह्यात खरीप हंगाम अक्षरशः संकटाच्या गर्तेत सापडल्याचा दावा करत आता जिल्ह्याच्या दुष्काळाचा आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत तातडीने समावेश करा, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे केली.
शिंदे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, जिल्ह्यात पिकांच्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत तब्बल ४५ ते ५० दिवसांचा पावसाचा प्रदीर्घ खंड पडला. परिणामी जमिनीतील ओलावा कमी झाला असून सोयाबीन, कापूस, तूर आणि मका पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.
विशेषतः सोयाबीनला फुलोरा, शेंगा लागणे आणि दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या काळात पाऊस न मिळाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
‘केवळ हंगामी पर्जन्यमानाच्या आकड्यांवर निर्णय घेऊ नका; पावसाचा खंड, जमिनीतील ओलावा आणि प्रत्यक्ष पीकनुकसानही पाहा!’ अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली.
तालुकानिहाय पीकपाहणी व पंचनामे, महसूल-कृषी विभागाचा वस्तुनिष्ठ अहवाल, शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, पीकविमा नुकसानभरपाई, पीककर्जात सवलत, रब्बीसाठी बियाणे-खते तसेच पशुधनासाठी चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे











Total Users : 3502279