spot_img
spot_img

बुलढाणा म्हणतंय… ‘ताई वाघीणच!’ विद्यार्थ्यांसाठी जयश्री शेळके थेट रस्त्यावर; शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अशी डरकाळी फोडली की जयस्तंभ चौक दणाणला!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमार आणि पेपरलीक प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुलढाण्यात आक्रमक पवित्रा घेत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. २२ जुलै रोजी शहरातील जयस्तंभ चौकात झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात घोषणांचा अक्षरशः भडिमार करण्यात आला. आंदोलन अधिक तीव्र होताच पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले.

या आंदोलनात शिवसेना (उबाठा) पक्षाच्या प्रवक्त्या अॅड. जयश्री शेळके यांचा आक्रमक पवित्रा विशेष चर्चेचा विषय ठरला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी थेट रस्त्यावर उतरलेल्या जयश्रीताईंनी केंद्र सरकारला जाब विचारत जोरदार आवाज उठविला. त्यामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमधूनही “बुलढाण्याची वाघीण” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटताना दिसली.

जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत आणि सहसंपर्कप्रमुख डी. एस. लहाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, युवक, महिला तसेच नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदविला. जयस्तंभ चौकात झालेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे परिसर काही काळ दणाणून गेला.

पेपरलीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराची जबाबदारी निश्चित करावी आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आक्रमकपणे मैदानात उतरलेल्या अॅड. जयश्री शेळके यांच्या उपस्थितीने आंदोलनाला आणखी धार मिळाली.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!