जळगाव जामोद (हॅलो बुलडाणा/ ज्ञानदेव राजनकर) नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींवर २० जुलै २०२६ रोजी झालेल्या कथित पोलिस कारवाईविरोधात जळगाव जामोद बार असोसिएशनने आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवार, २३ जुलै रोजी बार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
निवेदनात देशभरातील पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे नमूद करण्यात आले. शांततामय आणि लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कथित पोलिस कारवाई होणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर आवश्यक ती कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आर. पी. विश्वेकर आणि सचिव ॲड. वाघ यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. महिला अधिवक्ता वानखडे मॅडम, कारंगळे मॅडम आणि डोंगरदिवे मॅडम यांच्या हस्ते उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनावर ॲड. माहेश्वरी, ॲड. मारोडे, ॲड. माळपांडे, ॲड. गिरी आणि ॲड. इंगळे यांच्यासह बार असोसिएशनच्या इतर सदस्यांनी स्वाक्षऱ्या करून आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ ठाम भूमिका व्यक्त केली.
लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या नागरिकांचे घटनात्मक अधिकार अबाधित राहिले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने न्याय्य, संवेदनशील व निष्पक्ष दृष्टीने पाहावे, असा स्पष्ट इशाराही बार असोसिएशनने दिला.















Total Users : 3299946