spot_img
spot_img

STATE NEWS! ‘समता’च्या दारात EDच्या आरोपपत्राचा धडाका! भोंदू खरातच्या काळ्या कमाईसाठी 108 बेनामी खात्यांचा ‘रस्ता’ कुणी उघडला? ₹42.88 कोटींच्या घोटाळ्यात 3000 पानांचा बॉम्ब; काका कोयटे काय बोलणार?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा विशेष वृत्त) स्वतःला भगवान शिवाचा अवतार म्हणवत कथित चमत्कार, मृत्यूची भीती आणि धार्मिक विधींच्या नावाखाली भक्तांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप असलेल्या अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन बाबा’भोवती ईडीचा फास आणखी घट्ट झाला आहे. ₹42.88 कोटींच्या कथित मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात तब्बल 3000 पानांचे आरोपपत्र दाखल केल्याने खरातच्या कथित आर्थिक साम्राज्याचे एकामागून एक धक्कादायक पदर उघडू लागले आहेत.

सर्वात गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तो सहकारी पतसंस्थांमधील कथित बेनामी खात्यांचा! तपासात खरातशी संबंधित मोठ्या संख्येने संशयित खाती समोर आल्याचे वृत्त असून त्यातील अनेक खाती समता नागरी सहकारी पतसंस्थेशी संबंधित असल्याचे तपासातून पुढे आले आहे. काही कथित खातेदारांनी तर आपण कधी पतसंस्थेत गेलोच नाही, खाते उघडले नाही आणि सह्याही आपल्या नसल्याचे जबाब दिल्याचे वृत्त आहे. मग एवढ्या मोठ्या संख्येने खाती नेमकी उघडली कशी? KYC कोणी तपासले? खातेधारकांची प्रत्यक्ष पडताळणी झाली होती का? संस्थेच्या व्यवस्थापन आणि संचालक मंडळाच्या देखरेखीखाली नेमके काय सुरू होते? हे प्रश्न आता टाळून चालणार नाहीत.

समता पतसंस्थेशी संबंधित या संशयित व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या नेतृत्वाने, त्यात चेअरमन काका कोयटे यांनीही जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. कारण सहकार हा सामान्य माणसाच्या विश्वासावर उभा असतो. संस्थेचा गैरवापर करून कथित काळा पैसा फिरवला गेला असेल, तर तो केवळ आर्थिक गुन्हा नसून सहकाराच्या विश्वासालाच लागलेला सुरुंग ठरेल. अर्थात कोणाची वैयक्तिक गुन्हेगारी जबाबदारी आहे की नाही, हे ईडीचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया ठरवेल; मात्र संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या प्रत्येक व्यवहाराची पारदर्शक चौकशी झालीच पाहिजे.

खरातने भक्तांच्या भीतीचे भांडवल करून मिळवलेला पैसा विविध खात्यांतून फिरवून स्थावर-जंगम मालमत्तेत गुंतवल्याचा ईडीचा आरोप आहे. कोट्यवधींची रोख रक्कम, दागिने, बँक ठेवी आणि आलिशान मालमत्तांवर कारवाई झाल्याचेही समोर आले आहे.

भोंदू खरात एकटाच या आर्थिक जाळ्याचा सूत्रधार होता, की त्याच्या कथित काळ्या साम्राज्याला आर्थिक वाट मोकळी करून देणारे आणखी ‘पांढरपेशे’ चेहरे पडद्यामागे आहेत? 3000 पानांचे आरोपपत्र न्यायालयात पोहोचले आहे; आता ईडीच्या रडारवर पुढचा नंबर कुणाचा, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!

काय म्हणाले समता पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे?

या गंभीर प्रकरणाबाबत ‘हॅलो बुलढाणा’च्या प्रतिनिधीने समता नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन काका कोयटे यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी कोयटे म्हणाले, “हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर सध्या काहीही बोलू शकत नाही.”

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!