spot_img
spot_img

सिंदखेड राजा तहानलेला… शेतकरी उद्ध्वस्त! ‘कोरडा दुष्काळ’ जाहीर करा; तहसीलदारांच्या टेबलावर थेट आक्रोश!

सिंदखेड राजा (हॅलो बुलढाणा) शहरासह संपूर्ण तालुक्यात दीर्घकाळापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम अक्षरशः संकटात सापडला आहे. उडीद, मूग आणि सोयाबीनसह अनेक पिके पावसाअभावी नष्ट होण्याच्या मार्गावर असून, “सिंदखेड राजा तालुका तातडीने कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करा,” अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शेतकरी कैलास नारायण मेहेत्रे यांच्यासह शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात तालुक्यातील भयावह परिस्थिती मांडण्यात आली आहे. मोठ्या पावसाच्या खंडामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून खरीप हंगामातील मेहनत, बियाणे, खते, औषधे आणि मशागतीवर केलेला खर्च पाण्यात गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

“खरिपाचीच ही अवस्था असेल, तर रब्बीमध्ये काय आणि कसे पिकवायचे?” असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पिकांचे उत्पादन कमालीचे घटण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांवर पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने कोणतेही कठोर निकष न लावता सिंदखेड राजा तालुका कोरडा दुष्काळग्रस्त तालुका घोषित करून दुष्काळी सवलती तत्काळ लागू कराव्यात, पीकविम्याचा लाभ द्यावा आणि दुष्काळ निवारणासाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी बुलढाणा, उपविभागीय अधिकारी संजय खडसे आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनाही देण्यात येणार आहेत. आता प्रशासन शेतकऱ्यांच्या या आक्रोशाची दखल घेते की पुन्हा केवळ कागदी पाहणीवरच समाधान मानते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!