spot_img
spot_img

मेहकर तालुक्यातील पारडीत रात्री अचानक काळोख पसरला… टॉर्च शोधण्यासाठी हात पुढे केला अन् दबा धरून बसलेल्या ‘काळा’ने केला जीवघेणा वार!

मेहकर (हॅलो बुलढाणा/ अनिल राठोड) ग्रामीण भागातील विजेचा बेभरवशाचा खेळ आता नागरिकांच्या थेट जीवावर उठू लागला आहे. पारडी येथे वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर घरातील अंधारात टॉर्च शोधत असलेल्या ३४ वर्षीय तरुणाला सापाने दंश केल्याची धक्कादायक घटना १२ जुलै रोजी रात्री घडली. सुदैवाने कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.

परमेश्वर वामन गुराळकर (वय ३४, रा. पारडी) असे सर्पदंश झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री जेवणानंतर गुराळकर कुटुंबीयांसोबत घरात बसले होते. सायंकाळी सुमारे ७ वाजून ४५ मिनिटांनी अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि घरात काळोख पसरला. त्यामुळे परमेश्वर टॉर्च शोधत असताना घरात दडून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला.

हाताला जोरदार चावा बसल्याचे जाणवताच त्यांनी मोबाईलची टॉर्च सुरू केली. समोर साप दिसताच कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन सरकली. काही वेळातच परमेश्वर यांची प्रकृती खालावू लागल्याने घरात एकच धावपळ उडाली. शेजाऱ्यांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने जानेफळ येथील राठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ उपचार सुरू केल्याने परमेश्वर यांचा जीव वाचला.

या घटनेनंतर पारडीसह परिसरातील नागरिकांमध्ये महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात रात्री वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे अंधारात साप, विंचू आणि इतर विषारी प्राण्यांचा धोका वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे .एखाद्या निष्पाप नागरिकाचा बळी गेल्यानंतरच महावितरणला जाग येणार का? रात्रीचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!