बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात संताप उसळला असतानाच मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी गायकवाड यांच्यावर पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. या आदेशाला अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
अन्नदात्यावरील वक्तव्याने वाद पेटला!
शेतकरी आत्महत्यांबाबत बोलताना गायकवाड यांनी केलेल्या विधानामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये, अशा आशयाच्या त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आले आहेत. दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांबाबत लोकप्रतिनिधींनी संवेदनशीलतेने बोलण्याची अपेक्षा असताना या वक्तव्याने संतापात भर घातली.
शिंदेंची शिवसेना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतकार्य राबवत असताना गायकवाड यांच्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे प्राप्त माहितीत म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदेंनी कठोर कारवाईचे निर्देश दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
मित्रपक्षानेही सुनावले; माफीची मागणी!
या प्रकरणात वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनीही गायकवाड यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. गायकवाड यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे वादाचे पडसाद सत्ताधारी महायुतीतही उमटले आहेत.
कऱ्हाडमध्ये युवक काँग्रेसने आंदोलन करून गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.दरम्यान, आपले वक्तव्य शेतकऱ्यांबाबत नव्हते, तर व्यसनाधीन तरुणांच्या संदर्भात होते, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले आहे.
आता लक्ष पक्षाच्या अधिकृत निर्णयाकडे!
निलंबनाच्या आदेशाबाबत समोर आलेली माहिती पक्षांतर्गत कारवाईशी संबंधित आहे. गायकवाड यांचे निलंबन झाल्याची अधिकृत घोषणा अद्याप उपलब्ध नाही. त्यामुळे पक्षाचे निवेदनच कारवाईचे अंतिम स्वरूप स्पष्ट करणार आहे.





Total Users : 3684858