चौथा (हॅलो बुलढाणा/भागवत गायकवाड) बुलढाणा तालुक्यातील चौथा गावाच्या शिवारात भरदिवसा बिबट्या आढळल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आज सकाळी ९.४५ ते १० वाजेदरम्यान शेतकरी सुरेश पवार यांच्या शेतात ही घटना घडल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली.
शेतात मका कापणीसाठी महिला गेल्या असताना त्यांना बिबट्या दिसला. या बिबट्याने दोन हरणांची शिकार केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. ऐन शेतीकामाच्या वेळी बिबट्याचा वावर समोर आल्याने मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवसा शेतात बिबट्या दिसत असेल, तर शेतकऱ्यांनी आणि मजुरांनी काम करायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.
वनविभागाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून बिबट्याच्या बंदोबस्तासाठी योग्य नियोजन करावे. परिसरात पिंजरा लावून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सुरेश पवार, गणेश गाढे, रामेश्वर सपकाळ आणि बबन पवार यांनी केली आहे.





Total Users : 3684863