जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ज्ञानदेव राजनकर) रब्बी हंगाम २०२५-२६ अंतर्गत शासकीय भरड धान्य खरेदीचा शुभारंभ शुक्रवारी, १९ जून रोजी श्री सुपो जीनिंग, जळगाव जामोद येथे उत्साहात पार पडला. जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या हक्काच्या हमीभावाला प्रत्यक्ष खरेदीच्या माध्यमातून बळ मिळाले.
शासनाने यावर्षी किमान आधारभूत किंमत अंतर्गत ज्वारीला ३६९९ रुपये तर मक्याला २४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा माल टप्प्याटप्प्याने खरेदी केला जाणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. यावेळी प्रगतशील शेतकरी गटमने व पांडे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व बाजार समिती सभापती प्रसन्नजीत पाटील, समाधान उर्फ नानासाहेब पाटील, सौ. स्मितलताई पाटील, तहसीलदार पवन पाटील, किशोर केला, विठ्ठलराव वाघ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी स्वच्छ, वाळलेला व निकषांनुसार माल खरेदी केंद्रावर आणावा, असे आवाहन करण्यात आले. हमीभाव खरेदीमुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीपासून दिलासा मिळणार असून, शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.











