spot_img
spot_img

बुलढाण्यात भर बाजारात दबा धरून आले दोन ‘रुमालधारी’… आणि क्षणात महिलेची सोन्याची पोत गायब!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरातील गजबजलेल्या आठवडी बाजार परिसरात भर सायंकाळी सोनसाखळी चोरांनी पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे. विजया लेडीज कॉर्नरसमोर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी एका महिलेच्या गळ्यातील अंदाजे 24 ग्रॅम वजनाची, सुमारे 75 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन-पोत बळजबरीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना 16 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

फिर्यादी सुनिता राजू निकम या त्यांच्या भाचा आणि भाचीसह ज्युपिटर दुचाकीवरून किराणा सामान व फळे घेण्यासाठी आठवडी बाजारात गेल्या होत्या. त्या विजया लेडीज कॉर्नरसमोरून जात असताना मागून दुचाकीवर दोन इसम आले. दोघांनी डोक्याला रुमाल बांधलेले होते. मागे बसलेल्या इसमाने अचानक त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावली आणि आरोपी जैस्वाल चौकाकडे फरार झाले. फिर्यादीने नगर परिषद परिसरापर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला; मात्र गर्दीचा फायदा घेत आरोपी जयस्तंभ चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले.

चालत्या गाडीवरून सोन्याची पोत हिसकावताना महिला, तिचा भाचा आणि भाची खाली पडून गंभीर जखमी होण्याची शक्यता असतानाही आरोपींनी जीविताची पर्वा न करता हा प्रकार केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात दोन आरोपींविरुद्ध अपराध क्रमांक 511/2026, कलम 309, 3(5) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोउपनि रवी मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!