बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीकविम्यासाठी रविकांत तुपकर यांनी पुकारलेल्या आंदोलनाला राष्ट्रवादी महायुतीचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी बुलढाण्यात भेट देत जाहीर पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल करत बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि सत्तेतील केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावर अप्रत्यक्ष टोलेबाजी केली.
मिटकरी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखावर ज्यांच्या अंगाची तिळपापड होते, त्यांनी शिवरायांना अभिप्रेत असलेल्या शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या या आंदोलनालाही तितक्याच खंबीरपणे पाठिंबा द्यायला हवा. केवळ मीडिया समोर जाऊन भाषणबाजी करण्यात काही अर्थ नाही.” हा टोला आमदार संजय गायकवाड यांच्यावर असल्याची चर्चा आंदोलनस्थळी रंगली.
मिटकरी यांनी पुढे सांगितले की, “शिवाजी महाराज म्हणजे ते राजे होते, ज्यांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लागला तर कठोर शिक्षा करण्याचे आदेश दिले. मग आज शेतकरी रस्त्यावर उतरला असताना त्यांच्यासाठी आवाज उठवणे हाच खरा पुरुषार्थ आहे.”
दरम्यान, जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यावरही आंदोलनस्थळी शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रतापराव जाधव हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा ‘ऑपरेशन टायगर’मध्ये अधिक गुंतले आहेत का, असा सवाल उपस्थित करण्यात आला. उबाठा शिवसेनेतील फुटलेल्या काही खासदारांशी संपर्क आणि राजकीय हालचालींमध्ये त्यांचे नाव चर्चेत असताना, शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे त्यांचे दुर्लक्ष का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
रविकांत तुपकर यांनीही “प्रतापरावांना प्रेशर आणायची सवयच आहे,” असे म्हणत त्यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. मिटकरी यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा रोष थांबणार नाही, असा इशारा दिला.










