मलकापूर (हॅलो बुलढाणा) शहरातील एका अपार्टमेंटमध्ये बंद दरवाजाआड सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायाचा स्थानिक गुन्हे शाखेने नियोजनबद्ध सापळा रचून पर्दाफाश केला. बनावट ग्राहकाने व्यवहाराची खात्री करून ‘मिस कॉल’ देताच पोलिसांनी फ्लॅटला चारही बाजूंनी घेरून छापा टाकला. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, एक महिला आणि तिच्या पुरुष साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एफआयआरनुसार, मलकापूर शहरातील गोपालकृष्णनगर परिसरातील हेलोडे अपार्टमेंटमध्ये महिलांच्या मजबुरीचा फायदा घेत त्यांच्याकडून देहविक्री करवून घेतली जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांना मिळाली होती. त्यानंतर पंचांसमक्ष सापळा रचून नोंद केलेल्या १,५०० रुपयांच्या नोटांसह बनावट ग्राहकाला संबंधित फ्लॅटमध्ये पाठविण्यात आले.
रात्री सुमारे ७.५५ वाजता ठरलेला संकेत मिळताच महिला सहायक पोलीस निरीक्षक यशोदा कनसे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश जायभाये आणि पथकाने फ्लॅटवर धडक दिली. पोलिसांना तेथे दोन महिला आढळून आल्या. ग्राहकाकडून दीड हजार रुपये घेतले जात असून, त्यातील एक हजार रुपये कथित व्यवसाय चालविणारे दोघे ठेवत असल्याचे पीडित महिलांनी सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीत आहे.
पोलिसांनी सापळ्यासाठी दिलेल्या १,५०० रुपयांसह मोबाईल, सौंदर्यप्रसाधने व अन्य साहित्य असा एकूण ९१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. महिला पोलीस कर्मचारी दीपाली चव्हाण यांच्या फिर्यादीवरून संबंधित दोघांविरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.










Total Users : 3261789