बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नोंदणी व मुद्रांक विभागात मोठी प्रशासकीय हालचाल झाली असून सह दुय्यम निबंधक वर्ग-२ पदावर श्री. विजय जगन्नाथ सुर्यवंशी यांची बुलढाणा येथे बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाने १६ जून २०२६ रोजी शासन आदेश काढत ही बदली जाहीर केली. सुर्यवंशी हे सध्या वाशिम येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत होते. आता त्यांची बुलढाणा येथील रिक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन आदेशानुसार ही बदली सार्वजनिक सेवेच्या हितार्थ आणि प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने करण्यात आली असून आदेश तात्काळ अंमलात येणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सध्याच्या पदावरून एकतर्फी कार्यमुक्त करण्यात आले असून नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी विहित मुदतीत रुजू होणे बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, ठरलेल्या कालावधीत हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा स्पष्ट इशाराही शासनाने दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यात नोंदणी, मुद्रांक, दस्त नोंदणी आणि नागरिकांच्या महत्त्वाच्या व्यवहारांशी संबंधित कामे सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे










