spot_img
spot_img

मेहकर पालिकेत अखेर ‘महाविकास आघाडी’चा झेंडा; उबाठा–काँग्रेसचे १६ नगरसेवक एकत्र, सत्तेचे नवे समीकरण!

मेहकर (हॅलो बुलढाणा) नगरपालिकेच्या राजकारणात अखेर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न आता थेट मेहकर पालिकेत उतरला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस यांनी एकत्र येत स्पष्ट बहुमताचा दावा केला आहे. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांना काँग्रेसच्या ११ पैकी ९ नगरसेवकांनी जाहीर पाठिंबा दिल्याने पालिकेत उबाठा–काँग्रेस आघाडीचे १६ नगरसेवकांचे भक्कम बहुमत तयार झाले आहे.

डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेने नगराध्यक्षपदी शिवसेना उबाठा गटाचे किशोर गारोळे यांना निवडून दिले होते. एकूण २६ नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे ११, शिवसेना शिंदे गटाचे ९ आणि शिवसेना उबाठा गटाचे ६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र प्रत्येक पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवल्याने सुरुवातीला आघाडीचा ताळमेळ बसला नव्हता. आता मात्र काँग्रेसच्या ९ नगरसेवकांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केल्याने मेहकर पालिकेत सत्तेचे गणित पूर्णपणे बदलले आहे.

पत्रकार परिषदेत आमदार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार भूमिका मांडत शहराच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने साथ देण्याचे आश्वासन दिले. “नगराध्यक्ष किशोर गारोळे अबोल असले तरी कार्यक्षम आहेत. आता आघाडी मजबूत झाली आहे. मेहकर आगामी काळात जिल्हा राजकारणाचे केंद्र बनेल,” असा दावा त्यांनी केला.

काँग्रेसचे राज्य सरचिटणीस श्याम उमाळकर यांनीही बहुमताच्या बळावर विकासाचे आणि विश्वासाचे राजकारण करण्याचा सल्ला दिला. जे आज सोबत नाहीत, ते उद्या सोबत येतील, असे काम करा, असा संदेशही त्यांनी दिला.

एकूणच, मेहकर पालिकेत उबाठा–काँग्रेसच्या नव्या आघाडीमुळे शिंदे गटासमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे. आता या १६ सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर शहराच्या विकासाला गती मिळते की पुन्हा सत्तासंघर्ष पेटतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!