डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावाजवळील मादणी ते वडजी मार्गावर रस्ता खचून निर्माण झालेल्या जीवघेण्या खड्ड्याबाबत हॅलो बुलढाणा ने आवाज उठवताच अखेर प्रशासनाला जाग आली. बातमीचा इम्पॅक्ट होत सार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक ठिकाणी माती टाकून खड्डा बुजवण्याची कार्यवाही केली. मात्र आता ग्रामस्थांनी थेट सवाल उपस्थित केला आहे की साहेब, फक्त माती टाकून काय होणार?
मागील वर्षीच्या मुसळधार पावसात या रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला होता. वर्षभर वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करत होते. ना इशारा फलक, ना बॅरिकेड्स, ना कायमस्वरूपी दुरुस्ती; प्रशासन मात्र ढिम्म होते. हॅलो बुलढाणा ने यावर बातमी प्रसिद्ध केल्यानंतरच हालचाल सुरू झाली आणि खड्डा बुजवण्यात आला.
परंतु नागरिकांच्या मते ही केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता दोन-तीन वर्षांतच खचतो, याचा अर्थ कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. अशा ठिकाणी केवळ माती टाकून धोका टळणार नाही. पावसाळा तोंडावर असताना ही माती पुन्हा वाहून गेली, तर पुन्हा अपघाताचा धोका निर्माण होणार नाही का?
विशेष म्हणजे हा मार्ग केंद्रीय मंत्र्यांच्या गावाशी संबंधित असल्याने प्रशासनाने अधिक गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. ग्रामस्थांनी या रस्त्याची तांत्रिक तपासणी करून कायमस्वरूपी मजबुतीकरण, संरक्षण भिंत, पाणी निचरा व्यवस्था आणि डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.










Total Users : 3269953