डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) मेहकर तालुक्यातील मादणी येथे १४ जून रोजी प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी भेट दिली आणि याच भेटीदरम्यान निसर्गाचा एक अनोखा संकेत पाहायला मिळाला. शेतकरी रणजित जाधव यांच्या शेतातील शेडवर आढळलेल्या एका सरड्याने डोक्यावरील रंग लालसर केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात अशा रंगबदलाकडे पावसाच्या आगमनाचा संकेत म्हणून पाहिले जाते. या निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंजाबराव डख यांनी येत्या १० दिवसांत मान्सून सक्रिय होऊन दमदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत. पेरणीची तयारी पूर्ण असली तरी पावसाच्या प्रतीक्षेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अशा वेळी मादणी येथे प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसलेला हा नैसर्गिक संकेत आणि त्यानंतर डख यांनी वर्तवलेला अंदाज शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला आहे.
पंजाबराव डख यांनी सांगितले की, निसर्ग अनेक वेळा पावसाचे संकेत आधीच देत असतो. सरडा, पक्षी, मुंग्या, वाऱ्याची दिशा आणि वातावरणातील बदल यावरून ग्रामीण भागात पावसाचा अंदाज लावण्याची परंपरा आहे. मादणीतील हा रंगबदलही त्याच दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.
रणजित जाधव यांच्या शेडवरील या सरड्याचा फोटो सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. “आता पाऊस येणार” या आशेने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मात्र पेरणी करताना घाई न करता पुरेसा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा, असा सल्लाही देण्यात येत आहे.










