बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शहरात वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या वाहनधारकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने जोरदार संयुक्त कारवाई करत अक्षरशः धडक मोहीम राबवली. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
बुलढाणा शहर पोलीस आणि आरटीओ विभागाने शहरातील विविध भागांमध्ये वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. या तपासणीदरम्यान बेकायदेशीररीत्या बदललेले सायलेन्सर असलेल्या बुलेट, कर्णकर्कश प्रेशर हॉर्न, प्रखर दिवे, फॅन्सी नंबर प्लेट, तसेच आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. अनेक वाहनचालकांकडे लायसन्स, विमा, पीयूसी यांसारखी अत्यावश्यक कागदपत्रेच नसल्याचे समोर आले.
या मोहिमेत तब्बल 2 हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, 13 लाख रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. काही वाहनांवर 15 हजार ते 27 हजार रुपयांपर्यंतचा मोठा दंड आकारण्यात आला, तर गंभीर त्रुटी आढळलेल्या वाहनांवर जागेवरच जप्तीची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कॉलेज आणि क्लासेसला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचीही तपासणी करण्यात आली. अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवले जात असल्यास आता थेट पालकांवर कारवाई केली जाणार असल्याचा कडक इशारा पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिला आहे.
हेल्मेटचा वापर करा, वाहनांची कागदपत्रे सोबत ठेवा आणि वाहतूक नियमांचे पालन करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरातील वाहतूक शिस्तबद्ध आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याने नियम मोडणाऱ्यांना आता सावध राहावे लागणार आहे.












