spot_img
spot_img

केंद्रीय मंत्र्यांच्या गावाजवळच रस्ता खचला; ‘मादणी ते वडजी’ मार्गावर जीवघेणा प्रवास!

डोणगाव (हॅलो बुलढाणा/अनिल राठोड) जिल्ह्याचे खासदार तथा केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावाच्या परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मादणी ते वडजी या मुख्य मार्गावरील रस्त्याचा मोठा भाग मागील वर्षीच्या मुसळधार पावसात वाहून गेला. मात्र वर्ष उलटूनही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाला या धोकादायक रस्त्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, हा रस्ता अवघ्या दोन ते तीन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आला होता. पण पहिल्याच मोठ्या पावसात रस्ता खचल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाले नसते, तर रस्ता एवढ्या लवकर वाहून गेला असता का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत.

या मार्गावरून दररोज शेकडो वाहनांची, शेतकऱ्यांची तसेच शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा असते. रस्ता एका बाजूने खचल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी ना बॅरिकेड्स, ना इशारा फलक; त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे हा मार्ग केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावाशी संबंधित असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष कायम आहे. एखादा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला असून, मादणी ते वडजी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!