spot_img
spot_img

पोलीस बनण्याच्या तयारीत असलेल्या बुलढाण्याच्या विद्यार्थ्यावरच ‘गुन्हेगारी’ अत्याचार!रबरी पाईप, बेल्ट अन् काठीने मारहाण?

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) छत्रपती संभाजीनगर येथील पडेगाव परिसरातील भारत करिअर अकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या बुलढाण्याच्या १७ वर्षीय विद्यार्थ्यावर रॅगिंगच्या नावाखाली अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुलढाणा शिवसेना महिला आघाडीच्या उपतालुकाप्रमुख जयश्रीताई बोराडे यांचा मुलगा ओम बोराडे याच्यासोबत हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे बुलढाणा जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

ओम बोराडे हा १७ जून २०२५ पासून भारत करिअर अकॅडमीत पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण घेत आहे. प्रशिक्षण, हॉस्टेल आणि मेसचे शुल्क भरूनही विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेकडे अकॅडमी प्रशासनाने दुर्लक्ष केले काय? असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

९ जून २०२६ रोजी रात्री ओमने आईला फोन करून मारहाण झाल्याची माहिती दिली. मेसमध्ये जेवण शिल्लक घेतल्याच्या कारणावरून विवेक ढाकणे नावाच्या व्यक्तीने त्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. मात्र १० जून रोजी आईने अकॅडमीत जाऊन मुलाची भेट घेतल्यानंतर आणखी धक्कादायक बाबी समोर आल्या.

ओमच्या म्हणण्यानुसार, पी.टी. प्रशिक्षक विवेक ढाकणे याने पहाटे २ ते ४ च्या दरम्यान त्याला टेरेसवर बोलावून सिगारेट पिण्याचा आरोप करत रबरी पाईप, बेल्ट आणि काठीने बेदम मारहाण केली. शिक्षा म्हणून डोक्यावर उभे केले, तसेच सिगारेट आणि चुन्याचे पाणी जबरदस्तीने पाजल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. अथर्व महाजन, लकी वंजारी आणि भावेश पाटील या विद्यार्थ्यांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून, प्रशिक्षक, विद्यार्थी, संचालक बाळासाहेब घुगे आणि अकॅडमी प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

बुलढाण्याच्या मुलावर छत्रपती संभाजीनगरात असा अत्याचार होत असेल, तर प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षितता नेमकी कोणाच्या भरवशावर आहे? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!