मेहकर (हॅलो बुलढाणा) शहराच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या बसस्थानक व पोलीस स्टेशन आणि वाचनालय इमारतीचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीने सोहळ्याला वेगळाच रंग चढला.
मात्र या कार्यक्रमात मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या भाषणाने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले. भाषणादरम्यान त्यांनी मिश्कील शैलीत “अलीकडे महाराष्ट्रात एका खराताने नाव थोडंसं खराब केलं, पण बुलढाणा जिल्ह्यात खरातांचं नाव चांगलं आहे बरं का!” असा टोला लगावला.
पुढे त्यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, गटविकास अधिकारी दिनकरराव खरात आणि स्वतः आमदार सिद्धार्थ खरात यांचा उल्लेख करत “बुलढाणा जिल्ह्यात तरी खरातांचं राज्य आहे, आणि आम्ही खरात मंडळी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू,” असे म्हणत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. मेहकर उद्घाटन सोहळ्यात विकासकामांबरोबरच खरातांच्या या मिश्कील वक्तव्याचीही जोरदार चर्चा रंगली आहे.












