spot_img
spot_img

मेहकर नगरपालिकेत राजकीय भूकंप! काँग्रेसचे नगरसेवक अज्ञातस्थळी; बहुमताची चावी आता उबाठाच्या हातात?

मेहकर (हॅलो बुलढाणा) नगरपालिकेच्या राजकारणात मोठा राजकीय स्फोट झाला आहे. नगराध्यक्ष उबाठाचे किशोर गारोळे, सर्वाधिक नगरसेवक काँग्रेसचे आणि रिमोट कुणाच्या हातात? या प्रश्नाने मेहकरचे राजकारण तापले असतानाच काँग्रेसचे काही नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना झाल्याने नगरपालिकेतील सत्तेच्या गणिताला जबरदस्त कलाटणी मिळाली आहे.

मेहकरच्या मतदारांनी नगराध्यक्षपदी उबाठाचे किशोर गारोळे यांना निवडून दिले; मात्र स्पष्ट बहुमत दिले नाही. उबाठाचे 6, शिवसेना शिंदे गटाचे 9 आणि काँग्रेसचे सर्वाधिक 11 नगरसेवक असे संख्याबळ असल्याने सुरुवातीपासूनच नगरपालिकेची बॉडी अस्थिर राहणार का, असा प्रश्न नागरिकांसमोर होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कासम गवळी यांनी शिंदे सेनेशी हातमिळवणी केल्याची चर्चा रंगली होती. मात्र आता काँग्रेसच्या नगरसेवकांनीच वेगळा सूर लावत किशोर गारोळे यांच्या बाजूने उभे राहण्याची भूमिका घेतल्याने गवळी गटाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

अज्ञातस्थळी गेलेल्यांमध्ये गटनेता तथा नगरपालिकेचे उपाध्यक्ष मो. अलिम मो. ताहेर, वैभव उमाळकर यांच्यासह काही नगरसेवकांचे पती व कुटुंबीय सहभागी असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे मो. अलिम हे कासम गवळी यांचे विश्वासू मानले जात होते. त्यामुळे हा झटका गवळी यांच्यासाठी अधिकच राजकीय धक्कादायक ठरला आहे.

दरम्यान, मो. अलिम व वैभव उमाळकर यांनी “आम्ही काँग्रेस सोडलेली नाही. वेगळा गटही स्थापन केलेला नाही. मात्र विद्यमान नगराध्यक्ष किशोर गारोळे यांच्या प्रत्येक ठरावाला आमचे समर्थन राहील,” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

दुसरीकडे कासम गवळी यांनी “त्यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही. विकास करायचा असेल तर सत्तेसोबत राहावे लागते,” असे म्हणत आपली भूमिका मांडली. मात्र पडद्याआड माजी नगराध्यक्ष विलास चनखोरे, आमदार सिद्धार्थ खरात आणि किशोर गारोळे यांच्या रणनीतीचा मास्टर स्ट्रोक लागल्याची जोरदार चर्चा मेहकरच्या राजकारणात रंगली आहे.

एकूणच, मेहकर नगरपालिकेत काँग्रेसचे संख्याबळ असले तरी बहुमताची चावी आता उबाठाच्या हातात गेल्याचे चित्र दिसत असून येणाऱ्या काळात मेहकरचे राजकारण आणखी रंगणार हे निश्चित!

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!