spot_img
spot_img

कन्या शाळेची जागा रुग्णालयाला? काँग्रेसचा संतापाचा स्फोट! 22 जूनपर्यंत ठराव रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू – डॉ. स्वातीताई वाकेकर यांचा इशारा

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा/ ज्ञानदेव राजनकर)
महात्मा फुले कन्या शाळेच्या परिसरातील तब्बल 1200 चौ.मी. जागा उपजिल्हा रुग्णालयाला देण्याच्या नगर परिषदेच्या ठरावाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. मंगळवार, 9 जून 2026 रोजी विश्राम भवन, जळगाव जामोद येथे आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला.

“विद्यार्थिनींच्या शिक्षणाशी आणि सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. 22 जूनपर्यंत हा ठराव रद्द झाला नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल,” असा थेट इशारा काँग्रेस नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी दिला.

दि. 26 मे 2026 रोजी सत्ताधारी गटाने बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या शाळेत सुमारे 270 मुली शिक्षण घेत असून, ही जळगाव जामोद परिसरातील महत्त्वाची कन्या शाळा आहे. शाळेची जागा कमी करणे म्हणजे RTE कायदा 2009 आणि संविधानातील अनुच्छेद 21-अ अंतर्गत शिक्षणाच्या अधिकारावर गदा आणणे, असा काँग्रेसचा दावा आहे.

नगरसेविका **डॉ. समिना खान** यांनी आरोप केला की, सदर जागेवर RMSA व SSA अंतर्गत कोट्यवधी रुपयांच्या निधीतून वर्गखोल्या उभारण्यात आल्या आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचा विरोध आणि शिक्षण विभागाची परवानगी नसतानाही ठराव मंजूर करण्यात आला. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक मिनाताई सातव यांनीही, शाळेच्या परिसरात रुग्णालय आल्यास विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आणि संसर्गजन्य आजारांचा गंभीर प्रश्न निर्माण होईल, असे मत व्यक्त केले.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. संदीप उगले यांनीही काँग्रेसच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. “महात्मा फुले यांच्या नावाने चालणारी शाळा संपवण्याचा हा कट आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, डॉ. स्वातीताई वाकेकर, रामविजय बुरूगले, अँड. भाऊराव भालेराव, अमर पाचपोर, मिनाताई सातव, संगीताताई भारसाकळे, समिना खान यांच्यासह काँग्रेस व वंचितचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!