मोताळा (हॅलो बुलढाणा/ विश्वास वाघ) तालुक्यातील कोऱ्हाळा बाजार गावाच्या पाणीपुरवठ्यावर निर्माण झालेल्या गंभीर संकटाची बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने काल प्रसारित करताच दुसऱ्याच दिवशी त्याचा जोरदार इम्पॅक्ट दिसून आला. पिंपळगाव धरणातून पाइपलाइनद्वारे गावातील विहिरीत मृत मासे पोहोचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विहिरीतील पाणी सिल्वर रंगाचे दिसू लागले होते, तर धरण आणि विहीर परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.
उन्हाळ्याच्या तडाख्यामुळे धरणातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात घटली असून पाणी अतिगरम झाल्याने शेकडो मासे मृत झाल्याची शक्यता वर्तवली जात होती. हेच मृत मासे पाइपलाइनमधून थेट विहिरीत आल्याने गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या गंभीर प्रश्नाला ‘हॅलो बुलढाणा’ने आवाज दिल्यानंतर आरोग्य विभागाने तात्काळ दखल घेतली. डॉ. सचिन रावत, समुदाय आरोग्य अधिकारी, कोऱ्हाळा बाजार, आरोग्य सेवक तेजस पाटील, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे येथील आरोग्य अधिकारी सहाय्यक योगेश तायडे यांच्यासह संपूर्ण पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोग्य विभागाच्या टीमने प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित विहिरीची स्वच्छता करून घेतली.
गावातील नागरिकांना दूषित पाणी पिण्यापासून सावध राहण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र आता केवळ विहीर स्वच्छ करून भागणार नाही, तर पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी, पाइपलाइनची संपूर्ण स्वच्छता आणि गावाला सुरक्षित पाणीपुरवठा होणे अत्यंत गरजेचे आहे.










