spot_img
spot_img

नोकरीची आनंदवार्ता घेऊन परतणाऱ्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; चिखलीच्या अंबाशी फाट्याजवळ हृदयद्रावक घटना!

चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल):बातमी लिहिताना हात थरथरले… कारणही तसेच होते! ‘हॅलो बुलढाणा’चे तालुका प्रतिनिधी सय्यद साहिल यांचा जिवलग मित्र मयूर उमरे आता राहिला नाही…
मेहकर येथील बँकेत इंटरव्ह्यू देऊन निवड झाल्याची आनंदवार्ता घेऊन चिखलीकडे परतणाऱ्या 26 वर्षीय तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव मयूर गजानन उमरे, रा. चिखली असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर उमरे हा 6 जून रोजी दुपारी मेहकर येथील बँकेत इंटरव्ह्यूकरिता गेला होता. इंटरव्ह्यूमध्ये त्याची निवड झाल्याने कुटुंबीय आणि मित्रमंडळींना आनंदाची बातमी देण्यासाठी तो मोठ्या उत्साहात चिखलीकडे परतत होता. मात्र हा आनंद क्षणात दुःखात बदलला.

चिखली-मेहकर रोडवरील अंबाशी फाट्याजवळ एक वयस्कर व्यक्ती रस्ता ओलांडत असताना त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात मयूरने अचानक ब्रेक मारला. यावेळी वाहनावरील ताबा सुटून तो रस्त्यावर जोरात आदळला. या अपघातात मयूरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही आज 7 जून रोजी सकाळी उपचारादरम्यान मयूरची प्राणज्योत मालवली.

नोकरी लागल्याचा आनंद घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने चिखली परिसरात शोककळा पसरली आहे. मयूर हा ‘हॅलो बुलढाणा’चे चिखली तालुका प्रतिनिधी सय्यद साहिल यांचा जिवलग मित्र असल्याने ही बातमी लिहितानाही मन सुन्न झाले. कुटुंबीय, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!