spot_img
spot_img

लाखोंचा खर्च… पण दर्जा कुठे? मेहेकरच्या नव्या पोलीस स्टेशनला उद्घाटनाआधीच तडे; ठेकेदार-अधिकाऱ्यांची चौकशी होणार का?

मेहेकर (हॅलो बुलडाणा) शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या पोलीस स्टेशनच्या इमारतीने उद्घाटनाआधीच वादाचे रूप घेतले आहे. सुरक्षेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीच्या भिंतींना तडे गेल्याचे समोर आल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. लाखो रुपयांच्या सार्वजनिक निधीतून उभारलेली ही इमारत अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असतानाच तिच्या भिंतींना तडे दिसत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जनतेच्या पैशांचा हा खेळ आहे का? असा थेट सवाल आता मेहेकरकरांकडून उपस्थित केला जात आहे. पोलीस स्टेशनसारख्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील इमारतीचे बांधकामच जर उद्घाटनापूर्वी संशयाच्या भोवऱ्यात सापडत असेल, तर सामान्य नागरिकांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावर? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

या इमारतीच्या बांधकामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले का? कामाच्या वेळी गुणवत्तेची तपासणी झाली होती का? संबंधित अभियंते, अधिकारी आणि ठेकेदारांनी आपली जबाबदारी पार पाडली का? असे अनेक प्रश्न आता ऐरणीवर आले आहेत. सार्वजनिक पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक इमारतीत दर्जा आणि पारदर्शकता अपेक्षित असताना, मेहेकर पोलीस स्टेशनच्या इमारतीवरील तडे हे व्यवस्थेतील निष्काळजीपणाचे उदाहरण ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून बांधकामाचा दर्जा तपासावा, दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता गृह विभाग आणि बांधकाम विभाग या गंभीर प्रकाराची दखल घेतात का, की हा विषयही कागदोपत्रीच दडपला जातो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!