तामगाव (हॅलो बुलढाणा) सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाची बदनामी करणारी अश्लील व आक्षेपार्ह पोस्ट टाकणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नावाचा उल्लेख करत फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी तामगाव पोलिसांनी विशाल विनायक बकाल, रा. वरवट बकाल, ता. संग्रामपूर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पोलीस स्टेशन तामगाव येथील गोपनीय विभागात कार्यरत पोलीस कर्मचारी मनिष त्र्यंबक वानखडे हे कामकाज करीत असताना त्यांना मोबाईलवर फेसबुकवरील एक पोस्ट निदर्शनास आली. ‘ट्रिपल व्ही बकाल’ या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून बुलढाणा पोलीस अधीक्षक तांबे साहेबांबाबत अत्यंत अश्लील व बदनामीकारक मजकूर पोस्ट करण्यात आल्याचे आढळले.
ही पोस्ट पाहताच पोलिसांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर ठाणेदारांनी स्वतः पोस्टची खात्री करून आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या मते, जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांविषयी अशा प्रकारचा मजकूर प्रसारित करणे म्हणजे केवळ एका अधिकाऱ्याची नव्हे, तर संपूर्ण पोलीस यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे.
या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २९६ आणि ३५६(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विलास ज्ञानेश्वर बोपते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सोशल मीडियावर बेफाम लिहिणाऱ्यांसाठी हा प्रकार मोठा इशारा मानला जात आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलता, अपमान आणि बदनामी केली तर पोलिसांचा कायद्याचा बडगा कधीही उगारला जाऊ शकतो, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.












Total Users : 3545386