बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला असून कार्यालयीन कामकाजातील कथित अनियमिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विभागात पुरेसे कर्मचारी उपलब्ध असतानाही एका दिव्यांग लिपिकाकडे तब्बल पाच महत्त्वाच्या टेबलांचा कार्यभार सोपविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे इतर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून कार्यकारी अभियंता जितेंद्र काळे यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित लिपिक गेल्या बारा वर्षांपासून मुख्य कार्यालयात कार्यरत असून त्याच्याकडे लेखा, अर्थ, निविदा, भाडे आणि कंत्राटदार नोंदणीसारखी महत्त्वाची टेबल देण्यात आली आहेत. एकाच कर्मचाऱ्याकडे एवढा मोठा आणि संवेदनशील कार्यभार कसा देण्यात आला, याबाबत विभागातच कुजबुज सुरू आहे. विशेष म्हणजे या टेबलांमागे आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चाही विभागीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे, कार्यालयातील तीन लिपिकांकडे गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही कार्यभार नसल्याची माहिती समोर आली आहे. एका कर्मचाऱ्याकडे आठ महिन्यांपासून, दुसऱ्याकडे पाच महिन्यांपासून तर तिसऱ्याकडे दोन महिन्यांपासून कोणतेही टेबल नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे कर्मचारी अक्षरशः ‘काम मागत’ फिरत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, निविदा प्रक्रिया आणि कंत्राटदार नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या डिजिटल सिग्नेचर (DSC) चा वापर कार्यालयाबाहेरील खासगी संगणक केंद्रांवर होत असल्याचाही गंभीर आरोप समोर आला आहे. जर हे आरोप खरे असतील तर संपूर्ण निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
बदल्यांचा हंगाम सुरू असताना ‘सोयीच्या जागा आधीच फिक्स’ करण्यात आल्याची चर्चा विभागात रंगली आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार का आणि प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे आता कर्मचाऱ्यांसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.










